
नांदेड, 08 जुलै (हिं.स.)। पर्यावरणाचे संरक्षण ही केवळ एक जबाबदारी नसून, ती प्रत्येक पिढीने पुढील पिढीसाठी जपायची अमूल्य परंपरा आहे. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, श्रमाची प्रतिष्ठा, सामाजिक उत्तरदायित्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव कृतीतून रुजावी, या उद्देशाने संस्कृति संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या समर्थ व अनुसया वसतिगृहात रविवार विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी शेण व मातीचे योग्य प्रमाणात मिश्रण तयार करून त्यामध्ये बाभूळ, पळस, करंज, हिवर, आपटा, खैर, धावडा, बहावा, बोर आणि कडुलिंब यांसारख्या स्थानिक हवामानाशी सुसंगत, पर्यावरणीयदृष्ट्या महत्त्वाच्या देशी वृक्षांच्या बियांचा समावेश करत तब्बल १५०० सीड्स बॉल तयार केले. प्रत्येक सीड्स बॉलमध्ये केवळ एक बीज नव्हते, तर त्यामध्ये भविष्यातील हिरवागार परिसर, जैवविविधतेचे संवर्धन आणि पर्यावरण समृद्ध करण्याचा दृढ संकल्प दडलेला होता.
पावसाळ्याच्या काळात हे सीड्स बॉल डोंगर, माळराने, ओसाड जमीन आणि वनक्षेत्रात विखुरले जाणार आहेत. नैसर्गिकरीत्या अंकुर फुटून या बियांपासून हजारो नवीन वृक्ष उगवण्यास मदत होणार असून, स्थानिक जैवविविधतेचे संवर्धन, मृदसंधारण, जलसंवर्धन आणि हरित क्षेत्र वाढविण्यात या उपक्रमाचा मोलाचा वाटा असणार आहे.
या उपक्रमात पालक पर्यवेक्षक सौ. इंदू इंगोले, श्री. दत्ता हरी नागेश्वर, श्री. गंगाधर सूर्यवंशी तसेच प्रशाला शिक्षक श्री. प्रमोद भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी वृक्ष लावा या संदेशापलीकडे जात वृक्ष निर्माण करा हा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारला. श्रमसंस्कार, सामूहिक कार्यभावना, नियोजन, पर्यावरणाविषयी संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
संस्कृती संवर्धन मंडळाचे शैक्षणिक उपक्रम हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणारे, समाजाशी बांधिलकी निर्माण करणारे आणि जबाबदार नागरिक घडविणारे आहेत. अशा कृतीशील उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीची बीजे रुजत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis