
अकोला, 14 ऑगस्ट (हिं.स.)। स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, अमरावती क्षेत्रीय कार्यालय, बाबासाहेब धाबेकर विद्यालय, बार्शीटाकळी आणि नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने 'हर घर तिरंगा' अभियान तसेच 'विभाजन विभीषिका' दिवसानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रत्येक भारतीयांच्या मनात असलेल्या राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यात आली.
या कार्यक्रमास बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे प्राचार्य सैय्यद नासिर, बार्शीटाकळी येथील प्रतिष्ठित नागरिक शेषराव राजुरकर, दीपक चौरपगार, प्राध्यापक गुलाम नबी आझाद कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अनिस खान तसेच केंद्रीय संचार ब्युरोचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी शशिकांत पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य सैय्यद नासिर यांनी प्रत्येक नागरिकाने आपल्या क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने योगदान दिल्यास देशाच्या सर्वांगीण प्रगतीला मोठा हातभार लागेल, असे सांगितले. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे हीच खरी देशसेवा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
श्री. शशिकांत पटेल यांनी केंद्रीय संचार ब्युरोच्या कार्याची तसेच केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना आणि उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. 'हर घर तिरंगा अभियान' व 'विभाजन विभीषिका' दिवस साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करताना त्यांनी राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची जाणीव भावी पिढीमध्ये निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमादरम्यान केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्ती, तिरंगा, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय एकात्मतेचे विविध पैलू आपल्या कलाकृतींतून साकारले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास बार्शीटाकळी येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच बाबासाहेब धाबेकर विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. साहेबराव शिंदे, श्री. गजानन जाधव, श्री. सुनील कडू, सौ. सोनाली पाटील, सौ. पूजा धाबेकर, श्री. तारिक शेख यांच्यासह विद्यालयातील शिक्षकवृंद आणि केंद्रीय संचार ब्युरोचे श्री. सागर लाडोळे यांनी मोलाचे सहकार्य केले. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि तिरंग्याविषयी अभिमानाची भावना जागृत करणारा हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे