अनुभव कथनातून जिवंत झाल्या विलासराव देशमुखांच्या आठवणी
लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित पुस्तक लेखन संकल्प सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी
विलासराव देशमुख  स्मृतीदिन


लातूर, 14 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त जीवन विकास प्रतिष्ठानच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त आयोजित पुस्तक लेखन संकल्प सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणी आणि अनुभव कथन केल्याने त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या अनेक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.

जीवन विकास प्रतिष्ठान येथील मतिमंद विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीवन विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयसिंहराव देशमुख होते. यावेळी संस्थेचे सचिव धनंजय देशमुख, कोषाध्यक्ष अभय शहा, सहसचिव शंकरराव चव्हाण, संचालक पी. व्ही. कुलकर्णी, सदस्य बाबुराव सोमवंशी, जयप्रकाश अग्रवाल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, वैसाका डॉ. राजू गायकवाड, मुख्याध्यापक शिवप्रसाद भंडारे, जयश्री कुलकर्णी, जयलाल गायकवाड यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात धनंजय देशमुख यांनी विलासराव देशमुख यांच्या विकासकामांवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असली तरी सामान्य माणसाच्या जीवनातील त्यांच्या सहवासाच्या आठवणी आणि अनुभवही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सामान्य माणसाच्या अनुभवातील बोलके प्रसंग पुस्तकाच्या माध्यमातून जिवंत करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या वेळी नासिर सय्यद, अॅड. स्वाती माकणीकर, राजेसाहेब पाटील, दत्तात्रय परळकर, मारोती माने, बालाजी सुरवसे, मसाजी सदाफुले, आंबाजी तेलंगे, दयानंद बिडवे, अशोकराव शिंदे, पी. व्ही. कुलकर्णी, पुष्पा लामतुरे, अर्चना सूर्यवंशी आणि आजम शेख यांनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणी व अनुभव कथन केले. त्यांच्या आठवणींमधून विलासराव देशमुख यांचा सामान्य माणसाशी असलेला जिव्हाळा, विकासाची दूरदृष्टी आणि विविध क्षेत्रांतील योगदान अधोरेखित झाले.

या सर्व अनुभवांचे संकलन करून लवकरच पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यामुळे विलासराव देशमुख यांच्या कार्याचा सामान्य नागरिकांच्या अनुभवातून मांडलेला एक वेगळा दस्तऐवज आगामी काळात वाचकांसमोर येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिंधू इंगळे यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक जयलाल गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंकट पवार, अजम शेख, श्रीकृष्ण लाटे, महेश पाळणे, चेतन सोमवंशी, रवी कावळे, रामेश्वर गवरे यांच्यासह जीवन विकास प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

२४२ दिव्यांग विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

स्मृतिदिनानिमित्त जीवन विकास प्रतिष्ठान संचलित एड. विजयगोपाल अग्रवाल मूकबधिर विद्यालय, सौ. सुशिलादेवी देशमुख मुलींचे मूकबधिर विद्यालय तसेच मतिमंद विद्यालयातील एकूण २४२ विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. विजय अजनीकर, डॉ. हंसराज कांबळे, डॉ. प्रवीण डोराळे, डॉ. कल्पना नकाते आणि डॉ. पांडुरंग चंदशिव यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची तपासणी केली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आवश्यक औषधांचे वाटपही करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande