आंतरराष्ट्रीय मंचावर राणी मुखर्जींचा सन्मान; आयएफएफएम मध्ये विशेष पुरस्काराने गौरव
मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.)। चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान आणि प्रभावी अभिनयाची दखल घेत, ''इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न'' (IFFM) मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तीन दशकांच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीत, राणीने हि
राणी


मुंबई, 14 ऑगस्ट (हिं.स.)। चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट योगदान आणि प्रभावी अभिनयाची दखल घेत, 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' (IFFM) मध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

तीन दशकांच्या आपल्या यशस्वी कारकिर्दीत, राणीने हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या आहेत आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर भारतीय कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. ऑस्ट्रेलियात आयोजित या सोहळ्यात सन्मान स्वीकारताना, राणीने हा क्षण अत्यंत भावूक आणि विशेष असल्याचे सांगितले.

राणीने नमूद केले की, जेव्हा ती एक तरुणी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत आली होती, तेव्हा तिने कधीच कल्पना केली नव्हती की तिने साकारलेल्या भूमिका आणि चित्रपटांमुळे तिला जगभर ओळख मिळेल. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रेम आणि आदराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तिने सांगितले की, चित्रपट माध्यमात सांस्कृतिक सीमा ओलांडण्याची अद्भुत क्षमता आहे. तिच्या मते, या व्यवसायाची सर्वात मोठी देणगी म्हणजे जगभरातील लोकांचे मनोरंजन करण्याची आणि कथाकथनाच्या माध्यमातून विविध संस्कृतींना जोडण्याची संधी मिळणे होय.

आपल्या कारकिर्दीत राणीने ब्लॅक, हम तुम, युवा, बंटी और बबली, नो वन किल्ड जेसिका, हिचकी, मर्दानी मालिका आणि मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे यांसारख्या चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. तिच्या भूमिकांमधून नेहमीच भावनिक खोली आणि सशक्त स्त्री-पात्रे दिसून आली आहेत. IFFM ची २०२६ ची आवृत्ती १३ ते २३ ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जात आहे. राणीला मिळालेला हा सन्मान केवळ तिची वैयक्तिक कामगिरी नाही, तर भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर मिळत असलेल्या वाढत्या स्वीकृतीचेही प्रतीक आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande