
अमरावती, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
जिल्ह्यातील उत्तमसरा गावात जिल्हा परिषद शाळेतील कथित भ्रष्टाचाराच्या तक्रारीवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत अभिषेक सवई या तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. संबंधित प्रकरणाची तक्रार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याचा आरोप त्याने केला आहे.
शाळेतील विविध कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा दावा करत सवई यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, तक्रारीनंतरही ठोस कारवाई होत नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
या आंदोलनादरम्यान सवई यांनी आत्मदहनाचा इशाराही दिल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व संबंधित यंत्रणेतील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांना खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी सवई यांनी केली आहे. प्रशासन आता या तक्रारीची कोणती दखल घेते आणि चौकशीनंतर काय कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
-------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी