
वर्धा, 15 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सुरू असतानाच हिंगणघाट शहरावर काळाने घाला घातला. शहरातील आंबेडकर शाळेजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन शाळकरी मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने घरी जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेने हिंगणघाट शहरासह संपूर्ण परिसर हादरला असून, मृत मुलींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर तिन्ही मुली दुचाकीने जात होत्या. आंबेडकर शाळेजवळ त्या मार्गावरून जात असताना मागून आलेल्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की तिन्ही मुली गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिघींचाही मृत्यू झाला.
या अपघातात समृद्धी रूपक धामसे (१५), आरुही राजू चवरे (१७) आणि मिसबा जावेद शेख (१७) या तीन निष्पाप मुलींना आपला जीव गमवावा लागला. तिन्ही मुलींच्या अकाली निधनाची वार्ता परिसरात पसरताच शोककळा पसरली. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशभरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असताना हिंगणघाटमध्ये मात्र तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ट्रॅव्हल्स चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अपघात नेमका कसा घडला, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. अपघातातील वाहन ताब्यात घेण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेमुळे हिंगणघाट शहरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातून आणि प्रमुख मार्गांवरून धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स व अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करीत असलेल्या परिसरात वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे, तसेच भरधाव वाहनांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तीन कोवळ्या जीवांचा अपघाती मृत्यू ही केवळ त्यांच्या कुटुंबीयांचीच नव्हे, तर संपूर्ण समाजाची हानी आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने हिंगणघाटकरांच्या आनंदावर विरजण पडले असून, निष्पाप मुलींच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी