लातुरात बेकायदेशीर औषध विक्रीचा पर्दाफाश; १३ इंजेक्शनसह दोघांना अटक
लातूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विना परवाना शरीरास घातक असलेल्या औषधाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. इकबाल चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत Mephentermine
पोलीस कारवाई


लातूर, 17 ऑगस्ट (हिं.स.)।

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विना परवाना शरीरास घातक असलेल्या औषधाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रंगेहाथ पकडले. इकबाल चौक परिसरात करण्यात आलेल्या या कारवाईत Mephentermine Sulphate Injection IP (Termiva) ३० MG/१० MLच्या १३ बॉटल आणि सुझुकी स्कूटी असा एकूण ८४ हजार ६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

लातूर शहरातील अवैध धंदे तसेच बेकायदेशीर औषध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने इकबाल चौक परिसरात संशयित स्कूटीसह दोन इसमांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे मदनशहा ऊर्फ अदील निसार सय्यद (वय २१, रा. इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर) आणि देवानंद रोहिदास सूर्यवंशी (वय २६, रा. इकबाल चौक, मळवटी रोड, लातूर) अशी आहेत.

पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील एमएच-२४-बीसी-२७०० क्रमांकाच्या सुझुकी स्कूटीची झडती घेतली असता डिग्गीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत Mephentermine Sulphate Injection IP (Termiva)च्या १३ बॉटल आढळून आल्या. या औषधांची किंमत ४ हजार ६९ रुपये असून, औषध विक्रीसाठी वापरलेली स्कूटी अंदाजे ८० हजार रुपये किमतीची असल्याचे निष्पन्न झाले.

या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. संबंधित निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जप्त औषधांपैकी दोन बॉटल नमुना तपासणीसाठी घेतल्या असून, उर्वरित ११ बॉटल ताब्यात घेतल्या आहेत.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम १२३, १२५ आणि २७८ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध लातूर पोलिसांकडून कठोर कारवाई सुरू राहणार आहे. अशा प्रकारची संशयास्पद औषध विक्री आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande