
भूसंपादन प्रक्रियेतील त्रुटींवरही आक्षेप
छत्रपती संभाजीनगर, २४ ऑगस्ट (हिं.स.) । शेंद्रा-बिडकीन औद्योगिक वसाहतीसाठी प्रस्तावित जमीन संपादनाच्या पार्श्वभूमीवर घारदोन येथे संबंधित शेतकरी व ग्रामस्थांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. घारदोन, घारदोन तांडा, खोडेगाव, गाडीवाट, पाडळी आणि निलजगाव परिसरातील बहुसंख्य शेतकरी व ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीत स्थानिक सरपंच, ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांनी “सदर प्रकल्पासाठी आमची जमीन संपादित करू नये,” अशी एकमुखी ठाम भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या या भूमिकेची आणि त्यांच्या मनातील अस्वस्थतेची गंभीर दखल खासदार डॉ. कल्याण वैजिनाथराव काळे यांनी घेतली.
भूसंपादनाच्या नोटिसा प्रक्रियेवर आक्षेप
शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या नोटिसा बजावण्याच्या प्रक्रियेबाबतही गंभीर आक्षेप नोंदविले. काही शेतकऱ्यांना नोटिसा व ्हाटसऍप्पद्वारे पाठविण्याची तारीख, प्रत्यक्ष नोटीस देण्याची तारीख आणि ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस लावण्याची तारीख वेगवेगळी असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
तसेच, नोटीसवर हरकत नोंदविण्यासाठी अपेक्षित कालावधी उपलब्ध करून देण्यापूर्वीच जमीन मोजणीची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
‘शेतकऱ्यांच्या कायदेशीर मागणीला पूर्ण पाठिंबा’
शेतकऱ्यांच्या जमिनी, त्यांच्या उपजीविकेचा आधार आणि त्यांच्या कुटुंबांचे भवितव्य यांच्याशी संबंधित कोणताही निर्णय त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करून होऊ नये, अशी स्पष्ट भूमिका खासदार डॉ. काळे यांनी मांडली.
बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीबाबतची कायदेशीर व न्याय्य हरकत नोंदविण्याचे आवाहन केले. प्रत्येक संबंधित शेतकऱ्याने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन आपली हरकत दाखल करावी, असेही त्यांनी सांगितले.
गरज पडल्यास उच्च न्यायालयापर्यंत लढा
शेतकऱ्यांचे म्हणणे शासन दरबारी योग्य पद्धतीने मांडण्यासाठी आणि त्यांच्या समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही डॉ. काळे यांनी दिली.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis