अमरावतीत गोदामावर छापा; २० लाखांचा ३८५ क्विंटल धान्यसाठा जप्त
अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी-वलगाव रोडवरील पावर हाऊससमोरील एका खासगी गोदामात अवैधरित्या साठवून ठेवलेला तब्बल ३८५ क्विंटल धान्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या धान्याची अंदाजे किंमत २० लाख रुपये
नवसारी च्या गोदाम वरून 20 लाखाचा 385 क्विंटल धान्यसाठा जप्त


अमरावती, २४ ऑगस्ट (हिं.स.) : गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवसारी-वलगाव रोडवरील पावर हाऊससमोरील एका खासगी गोदामात अवैधरित्या साठवून ठेवलेला तब्बल ३८५ क्विंटल धान्यसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या धान्याची अंदाजे किंमत २० लाख रुपये असून, या प्रकरणी अजय झुनिलाल साहू (६५, रा. मसानगंज) याच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

अन्नधान्य वितरण अधिकारी प्रवीण उत्तमराव राऊत यांनी ही कारवाई केली.

नवसारी येथील जमीर मन्सुरी यांच्या नावावर असलेल्या खासगी गोदामात हा धान्यसाठा ठेवण्यात आला होता. संबंधित व्यक्तीकडे धान्य साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसतानाही मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे तपासणीत समोर आले. गेल्या १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता अधिकाऱ्यांनी गोदामाची तपासणी केली. सुमारे ३ हजार चौरस फुटांच्या गोदामात रंगीबेरंगी प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धान्य साठवून ठेवलेले आढळले. त्यामध्ये तांदूळ आणि गव्हाचा साठा होता.

अधिकाऱ्यांनी अजय साहू याच्याकडे बिले, स्टॉक रजिस्टर, परवाना आणि विक्री रजिस्टर यांसह आवश्यक कागदपत्रांची मागणी केली. मात्र, त्याला यापैकी कोणतेही कागदपत्र सादर करता आले नाही. चौकशीदरम्यान तो इतवारा बाजारातून धान्याची किरकोळ खरेदी करत असल्याचे सांगितले.

तांदळात फोर्टिफाइड राइस कर्नेलचे कण

गोदामातील तांदळाच्या तपासणीदरम्यान त्यामध्ये फोर्टिफाइड राइस कर्नेलचे कण आढळून आले. त्यामुळे हा तांदूळ सरकारी धान्य दुकानांशी संबंधित असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तांदूळ आणि गव्हाचे नमुने तीन प्रतींमध्ये घेण्यात आले असून, त्यातील एक प्रत आरोपीला देण्यात आली आहे. उर्वरित नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

गोदामातून जप्त केलेला धान्यसाठा दोन ट्रकमध्ये भरून त्याचे वजन करण्यात आले. दोन्ही वाहनांमधील पोत्यांसह आणि वाहनांचे स्वतंत्र वजन वजा केल्यानंतर एकूण ३८५ क्विंटल धान्यसाठा असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील तांदळाची किंमत सुमारे १४ लाख रुपये असल्याची माहिती आहे.

नियमांचे पालन न करता मोठ्या प्रमाणात धान्यसाठा केल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी अजय झुनिलाल साहू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande