दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांना मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
* विक्रीतून मिळालेली ५१ हजारांची रक्कम विद्यार्थ्यांनाच भेट * मनपा मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये दोन दिवसांत २ हजारांहून अधिक राख्यांची विक्री मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राख्यांना मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


* विक्रीतून मिळालेली ५१ हजारांची रक्कम विद्यार्थ्यांनाच भेट

* मनपा मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये दोन दिवसांत २ हजारांहून अधिक राख्यांची विक्री

मुंबई, 26 ऑगस्ट (हिं.स.) - रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन मुंबईकरांसमोर आलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मुंबईकरांनी मनापासून दाद दिली. महानगरपालिका मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राखी प्रदर्शनात या विद्यार्थ्यांनी तब्बल २ हजार ५२ राख्यांची विक्री केली. या विक्रीतून तसेच इतर वस्तूंच्या विक्रीतून ५१ हजार १९० इतकी रक्कम जमा झाली. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी केलेल्या विक्रीतून जमा झालेली ही रक्कम त्याच विद्यार्थ्यांना भेट म्हणून देण्यात आली, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचे खरे यश ठरले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती राजेश्री शिरवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा श्रीमती मीनल तुर्डे यांच्या संकल्पनेतून आणि नियोजन विभागाच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हे विशेष राखी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महानगरपालिकेच्या विशेष शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

स्वहस्ते साकारलेल्या राख्यांना पसंती

महानगरपालिकेच्या विविध विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी आकर्षक आणि कल्पक राख्या स्वतः तयार केल्या होत्या. या राख्या विक्रीसाठी महानगरपालिका मुख्यालय तसेच विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. आपल्या भावंडांसाठी राखी खरेदी करण्यासाठी आलेल्या मुंबईकरांनी या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्यांना पसंती दिली. राखी खरेदी करण्यासोबतच या विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याचे कौतुकही केले.

दिनांक २४ ऑगस्ट २०२६ रोजी महानगरपालिका मुख्यालयासह विविध प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये १,२९९ राख्यांची विक्री झाली. त्यातून इतर वस्तूंसह एकूण ३१,४७५ रुपये इतकी रक्कम जमा झाली. तर दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी विविध विभाग कार्यालयांमध्ये ७५३ राख्यांची विक्री झाली आणि इतर वस्तूंसह १९,७१५ रुपये इतकी रक्कम जमा झाली. अशा प्रकारे दोन दिवसांत एकूण २,०५२ राख्या विकल्या गेल्या.

राख्या विकल्या अन् मिळाले प्रोत्साहनाचे अनमोल बळ

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केलेल्या वस्तूंची विक्री स्वतः अनुभवली आणि त्यातून मिळालेल्या रकमेचे थेट प्रोत्साहनही त्यांना मिळाले. त्यांच्या कष्टाला मिळालेली ही आर्थिक दाद केवळ रकमेपुरती मर्यादित नसून, ‘आपल्या कलेला आणि मेहनतीला किंमत आहे’ हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणारी ठरली.

महानगरपालिका मुख्यालयात एस. जी. बारवे, लायन्स जुहू सेंटर आणि नारे पार्क या शाळांमधील विद्यार्थ्यांनी राख्यांची विक्री केली. त्याचप्रमाणे एम/पूर्व, डी, एफ/दक्षिण, जी/दक्षिण, जी/उत्तर, एच/पूर्व, एच/पश्चिम, के/पश्चिम, पी/दक्षिण, आर/दक्षिण, आर/मध्य, एफ/उत्तर, एल, एन, एस, टी आणि एम/पश्चिम या प्रशासकीय विभाग कार्यालयांमध्ये महानगरपालिकेच्या विविध विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मुंबईकरांच्या खरेदीतून उमलला विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास

राखी ही केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाची आठवण करून देणारी वस्तू नसून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून ती दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कष्ट, कौशल्य आणि आत्मविश्वासाचीही प्रतीक ठरली. आपल्या हाताने तयार केलेल्या राख्या नागरिकांनी आवडीने खरेदी केल्याचे पाहून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हा या उपक्रमातील सर्वांत भावस्पर्शी क्षण ठरला.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या सर्जनशीलतेला योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबनाची दिशा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात आहे. या उपक्रमाला मुंबईकरांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ‘संधी मिळाली तर प्रत्येक हात काहीतरी सुंदर घडवू शकतो’ याची प्रचिती देणारा ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande