सोलापुरात ठाकरे-शिंदे गटाचे नेते एकाच मंचावर
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना, सोलापुरात मात्र या राजकीय मतभेदांपलीकडचे सौहार्द पाहायला मिळाले. लेझीम आणि सोलापूरच्या पारंप
सोलापुरात ठाकरे-शिंदे गटाचे नेते एकाच मंचावर


सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असताना, सोलापुरात मात्र या राजकीय मतभेदांपलीकडचे सौहार्द पाहायला मिळाले. लेझीम आणि सोलापूरच्या पारंपरिक संस्कृतीच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गटाचे स्थानिक नेते एकाच मंचावर आले.विधिमंडळाची अंदाज समिती सध्या सोलापूर दौऱ्यावर आहे.

समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार अर्जुन खोतकर यांच्यासह आमदार हेमंत पाटील यांच्या स्वागत आणि सत्काराचे आयोजन शहरातील ‘थोरला मंगळवेढा तालीम’च्या वतीने करण्यात आले होते.आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या तालमीत दररोज रात्री लेझीमचा सराव सुरू आहे. हलगी आणि संबळाच्या निनादात ४००हून अधिक कार्यकर्ते लेझीमचा सराव करीत आहेत.

शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे हे या तालमीचे मार्गदर्शक असून, त्यांच्या पुढाकारातून हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे विशेष राजकीय आकर्षण ठरले ते शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सोलापूर जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांच्या उपस्थितीचे. राज्याच्या राजकारणात दोन्ही गटांमध्ये तीव्र आरोप-प्रत्यारोप सुरू असताना सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी मात्र राजकीय मतभेद बाजूला ठेवत एकाच व्यासपीठावर उपस्थिती लावली.विशेष म्हणजे, प्रताप चव्हाण यांच्या हस्ते शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर आणि हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande