
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ग्रामीण आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पंढरपूर तालुक्यातील अनवली येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी शासकीय निवासी शाळा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून सुरू करण्यात आली आहे. सध्या इयत्ता सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, प्रत्येक वर्गाची प्रवेश क्षमता ४० विद्यार्थ्यांची आहे.
शासकीय निवासी शाळेत विद्यार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून मोफत निवास, भोजन, गणवेश, पाठ्यपुस्तके, वह्या, स्टेशनरी तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून दररोज सकस व संतुलित भोजन देण्यात येते. त्यासोबत सकाळचा नाश्ता, दूध, अंडी आणि फळांचाही आहारात समावेश करण्यात आला आहे. आठवड्यातून दोन वेळा मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शाळेत आर.ओ. प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांच्या शारीरिक विकासासाठी क्रीडांगण तसेच विविध क्रीडा साहित्याची सुविधा उपलब्ध आहे.
शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, यासाठी विविध विशेष उपक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन देण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला जात आहे.
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही निवासी शाळा महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड