
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। ऑगस्टअखेरपर्यंत तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, राजस्थानमध्ये हवेचा दाब कमी झाल्यानंतर साधारण १ सप्टेंबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला आहे. परतीच्या मॉन्सूनदरम्यान सोलापूरसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत दमदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
जून-जुलै महिन्यांत अपेक्षित पाऊस न झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष रब्बी हंगामासाठी महत्त्वाच्या असलेल्या परतीच्या पावसाकडे लागले आहे. परतीच्या काळात चांगला पाऊस झाल्यास ज्वारी, करडई यांसारखी रब्बी पिके घेण्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकते.
सध्याच्या हवामान स्थितीचा दाखला देताना डॉ. साबळे यांनी अल निनोचा प्रभाव कमी झाल्याने यंदाचा परतीचा मॉन्सून चांगला राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. राजस्थानमध्ये हवेचा दाब कमी झाल्यानंतर मॉन्सूनच्या माघारीच्या हालचाली सुरू होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रातील पावसावरही होऊ शकतो.
सोलापूरसह महाराष्ट्रातील सुमारे १५ जिल्हे आणि ८४ तालुके परतीच्या पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्याचे डॉ. साबळे यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळातील पावसाचे प्रमाण रब्बी हंगामाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी परतीचा पाऊस उपयुक्त ठरावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. दमदार पाऊस झाल्यास जमिनीतील ओलावा वाढून रब्बी पिकांच्या पेरणीसाठी पोषक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड