
मुंबई, 26 ऑगस्ट, (हिं.स.)। ज्येष्ठ बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांच्यावर बुधवारी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांची पत्नी, अभिनेत्री अरुणा इराणी आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते. पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी अत्यंत भावूक झाल्या होत्या. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कुटुंबातील सदस्य त्यांना सावरताना दिसत आहेत.
चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे २५ ऑगस्ट रोजी वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने झालेल्या त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. कुकू कोहली यांची अंत्ययात्रा अंधेरी पश्चिम येथील त्यांच्या 'ग्रीन एकर्स' या निवासस्थानापासून सुरू झाली. ओशिवरा स्मशानभूमीत कुटुंबीय आणि जवळच्या सहकाऱ्यांनी त्यांना अश्रूपूर्ण निरोप दिला. एका व्हिडिओमध्ये अरुणा इराणी पांढऱ्या वस्त्रात दिसत असून, पतीला गमावल्याचे अतीव दुःख त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्या ढसाढसा रडताना दिसत आहेत. या भावूक दृश्यांनी त्यांचे चाहते आणि चित्रपटसृष्टीतील मंडळींनाही हेलावून सोडले.
कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलीवूडमधील अनेक दिग्गज उपस्थित राहिले. विकी कौशल, कतरिना कैफ, अशोक पंडित आणि रोहित शेट्टी यांच्यासह अनेक कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली. कुकू कोहली यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे, 'फूल और कांटे' या चित्रपटाद्वारे त्यांनी अजय देवगणला अभिनेता म्हणून चित्रपटसृष्टीत आणले. 'सुहाग', 'हकीकत' आणि 'ये दिल आशिकाना' यांसारख्या चित्रपटांसाठीही ते ओळखले जातात. त्यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपटसृष्टीने एक अनुभवी चित्रपट निर्माता गमावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर