
सोलापूर, 26 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील नागरिकांची सुरक्षा, गुन्हेगारीवर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून बसविण्यात आलेले ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे आणि १० स्मार्ट सिग्नल सध्या दिवसा बंद राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. स्ट्रीट लाईटच्या वीज जोडणीवर ही यंत्रणा अवलंबून असल्याने सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत त्यांचा वापर करता येत नसल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेतून धर्मवीर संभाजी महाराज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चार हुतात्मा पुतळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता आणि हरिभाई देवकरण प्रशाला यांसह शहरातील प्रमुख ठिकाणी ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग, दरोडा, खून, हाणामारी तसेच गंभीर अपघातांच्या तपासात या कॅमेऱ्यांची पोलिसांना मोठी मदत होते. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई केली जाते.
मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, रिक्षाच्या चालकाच्या सीटवर प्रवाशांना बसविणे यांसारख्या प्रकारांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाते. त्यामुळे वाहनचालकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्यास सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
स्ट्रीट लाईट बंद होताच सीसीटीव्हीही बंद
मात्र, हे सर्व कॅमेरे आणि १० नवीन स्मार्ट सिग्नल स्ट्रीट लाईटच्या मीटरला जोडण्यात आले आहेत. महावितरणकडून दिवसा स्ट्रीट लाईट बंद केली जात असल्याने त्याच वेळी सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिग्नलची वीजही खंडित होते.
परिणामी, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये दिवसा वाहतूक नियमन आणि सुरक्षेसाठी उभारण्यात आलेली स्मार्ट यंत्रणाच निष्क्रिय राहत आहे. गुन्हेगारी आणि वाहतूक नियंत्रणासाठी महत्त्वाची असलेली ही यंत्रणा दिवसा कार्यरत राहण्यासाठी स्वतंत्र वीज जोडणीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड