
छत्रपती संभाजीनगर, 27 ऑगस्ट, (हिं.स.)। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) नेत्ररोगचिकित्सा विभागात लवकरच अत्याधुनिक मशिनरी दाखल होणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत घाटीच्या नेत्ररोग विभागासाठी १४ कोटी ९१ लाख ३० हजार ६०९ रुपये निधीच्या खरेदीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने तांत्रिक मान्यता दिली आहे. या निधीतून विविध प्रकारची ५२ अत्याधुनिक यंत्रे आणि साधनसामग्री खरेदी केली जाणार आहे.
विशेष म्हणजे, जे अत्याधुनिक उपचार केवळ मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत, ते आता छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मिळणार आहेत. यामुळे खासगी रुग्णालयात किमान ५० ते ७५ हजार रुपये खर्च येणाऱ्या शस्त्रक्रिया आता घाटीतच मोफत किंवा अल्पदरात होणे शक्य होणार आहे. त्यामुळे घाटीचा नेत्ररोग विभाग अधिक सक्षम होणार आहे.
या अत्याधुनिक उपकरणांमध्ये डोळ्यांच्या आतील पडद्याच्या (रेटिना) अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी डिटेक्ट्रॉमी मशीन, आय बँक स्पेक्युलर मायक्रोस्कोप व कॉर्नियल टोपोग्राफी यांसारख्या उपकरणांचा समावेश आहे. कॉर्निया प्रत्यारोपणासाठीही ही उपकरणे उपयुक्त ठरणार आहेत.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis