रत्नागिरी : जिल्ह्यातील सात सायकलपटूंची आग्रा ते राजगड मोहीम यशस्वी
रत्नागिरी, 28 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील सात सायकलपटूंनी आग्रा ते राजगड अशी १४०० किलोमीटरहून अधिक अंतराची सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबच्या कैदीतून बुद्धिचातुर्याने करून घेतलेल्य
दापोलीतील सायकलपटू सुनील शिंदे


रत्नागिरी, 28 ऑगस्ट (हिं.स.) । जिल्ह्यातील सात सायकलपटूंनी आग्रा ते राजगड अशी १४०० किलोमीटरहून अधिक अंतराची सायकल मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर संभाजी महाराज यांनी औरंगजेबच्या कैदीतून बुद्धिचातुर्याने करून घेतलेल्या सुटकेच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या शिवचातुर्य दिनानिमित्त पुण्याच्या गरुडझेप संस्थेतर्फे १७ ते २७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत आग्रा ते राजगड सायकल मोहीम आयोजित केली होती. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे सुनील शिंदे (वय ५६) तसेच चिपळूण सायकलिंग क्लबचे प्रशांत दाभोळकर, हेमंत भोसले, ज्योती परांजपे, डॉ. अश्विनी गणपत्ये, रमा करमरकर आणि अमित कवितके (रत्नागिरी) असे सायकलपटून सहभागी झाले होते.

गरुडझेप मोहिमेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आबा गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरीष लोणकर यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेत महाराष्ट्रातून ५० सायकलपटू सहभागी झाले होते. यामध्ये सोबत शिवज्योत घेऊन धावणारे शिवभक्त तसेच मर्दानी खेळ सादर करणारे वीरही होते. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या चार राज्यांतून जाणाऱ्या या ऐतिहासिक मोहिमेचा मार्ग आग्रा, ग्वाल्हेर, शिवपुरी, गुना, पाचोर, देवास, ठिकरी, नरडाणा, चांदवड, संगमनेर, पुणे, राजगड असा होता. आग्रा येथील उष्णतेपासून ते वाटेतील चढउतार ऊनवारा व पावसापर्यंत विविध आव्हानांना सामोरे जात हा सायकल प्रवास जिद्दीने पूर्ण झाला.

याबद्दल अधिक माहिती देताना दापोलीचे सुनील शिंदे यांनी सांगितले की, मी पहिल्यांदाच अशा मोठ्या लांब अंतराच्या ऐतिहासिक सायकल मोहिमेत सहभागी झालो होतो. आम्ही दररोज १०० ते १५० किमी सायकल चालवली. अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. ठिकठिकाणी ग्रामस्थांकडून आमचे स्वागत, पाहुणचार, गप्पागोष्टी झाल्या. आम्हीही या सर्वांना शिवचातुर्य दिन आणि आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे महत्त्व पटवून दिले. हा खूपच आनंददायी, आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande