मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे, कोंडी आणि अडथळे पालकमंत्री गोगावलेंचा दणका; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनांचे आदेश
रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तसेच अन्य अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यं
खड्डे, कोंडी अन् अडथळ्यांवर पालकमंत्र्यांचा दणका; गणेशोत्सवापूर्वी उपाययोजनांचे आदेश


रायगड, 28 ऑगस्ट (हिं.स.)। गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि वाहतूक कोंडीमुक्त व्हावा, यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे तसेच अन्य अडचणी तातडीने दूर करण्याचे निर्देश पालकमंत्री भरत गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना दिले. महामार्गाच्या कामाबाबत केवळ कार्यालयीन अहवालावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.

पनवेल-पळस्पे येथून पालकमंत्री गोगावले यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल, प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महामार्गावरील ज्या-ज्या ठिकाणी समस्या जाणवत आहेत, त्या ठिकाणी थांबून पालकमंत्र्यांनी परिस्थितीची पाहणी केली. काही ठिकाणी सुरू असलेली कामे पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावतो आणि त्याचा परिणाम पुढील मार्गावरील वाहतूक कोंडीवर होतो. त्यामुळे खड्डे तसेच रस्त्याशी संबंधित अन्य समस्या गणेशोत्सवापूर्वी दूर करण्यासाठी यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करावे, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या काळात मुंबई, ठाणे, पुणे आदी भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे रवाना होतात. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. शांतता समितीच्या बैठकीनंतर माणगावपर्यंत महामार्गाची पाहणी करण्यात आली.

दरम्यान, गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी नियंत्रणात ठेवण्यासाठी रायगड पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. गर्दी, वाहतूक कोंडी आणि विविध परिस्थितींमध्ये पोलिसांकडून बजावण्यात येणाऱ्या जबाबदारीबद्दल त्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande