नेपाळमध्ये अडकलेल्या परभणीकरांची माहिती प्रशासनाला द्या : पालिका आयुक्त
परभणी, 28 ऑगस्ट (हिं.स.)। नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नागरिक आणि पर्यटक तेथे अडकले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महा
नेपाळमध्ये अडकलेल्या परभणीकरांची माहिती प्रशासनाला द्या : पालिका आयुक्त


परभणी, 28 ऑगस्ट (हिं.स.)। नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील नागरिक आणि पर्यटक तेथे अडकले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने परभणी शहर किंवा जिल्ह्यातील कोणताही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकला असल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. अडकलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी अथवा परिचितांनी संबंधित अर्जामध्ये आवश्यक माहिती अचूकपणे भरून ती नोंदवावी, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित अर्जातील सर्व अनिवार्य रकाने भरून माहिती सादर करणे आवश्यक आहे. ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता अडकलेल्या व्यक्तींची खात्रीशीर आणि अचूक माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या मदतीसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.

गरज भासल्यास महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रण कक्षाशी 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. तसेच CONTROLROOM@maharashtra.gov.in या ई-मेलवरही अडकलेल्या नागरिकांबाबतची माहिती अथवा मदतीसाठी संपर्क करता येणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande