राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक; नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करण्याचे काम सरकारने केले आहे. पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत तीनवेळा झालेल्या सविस्तर चर्चेत सरकारने सुरुवातीच्या सर्व मागण्या तातडीने मान्य केल्या. त्यानंतरही त्य
राहुल गांधींच्या रिलाँचिंगसाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक  भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार


मुंबई, 28 ऑगस्ट (हिं.स.)। आदिवासी विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मागण्या मान्य करण्याचे काम सरकारने केले आहे. पुण्यातल्या आदिवासी विद्यार्थ्यांसोबत तीनवेळा झालेल्या सविस्तर चर्चेत सरकारने सुरुवातीच्या सर्व मागण्या तातडीने मान्य केल्या. त्यानंतरही त्यांनी केलेल्या आणखीही काही मागण्याही मान्य करत त्यासंदर्भात लिखित आश्वासनही दिले. मात्र तरिही केवळ राहुल गांधींच्या रिलाँचिंगचा इव्हेंट म्हणून हे आंदोलन करण्याचे काँग्रेसचे षड्यंत्र महाराष्ट्राने ओळखले आहे. यात काँग्रेसचे तोंड भाजल्याशिवाय राहणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अतिशय प्रामाणिकपणे मेहनतीने अभ्यास करत आमचे आदिवासी विद्यार्थी पुण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहामध्ये राहून शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र राहुल गांधींचा पुढचा महाराष्ट्र दौरा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी या विद्यार्थ्यांवर दबाव टाकण्यात येत आहे. राहुल गांधींचे, विजय वडेट्टीवार आपल्या मुलीचे तसेच अनेक काँग्रेस नेते आपल्या मुलामुलींचे करिअर सेट करण्यासाठी आदिवासी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न गेल्या 16 दिवसापासून या आंदोलनाच्या माध्यमातून होत असल्याची टीका श्री. बन यांनी केली.

श्री. बन पुढे म्हणाले, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आतापर्यंत तीन वेळेला विद्यार्थ्यांसोबत चर्चेला गेले. विद्यार्थ्यांची इच्छा असेल तर चौथ्या वेळेलाही ते चर्चा करायला तयार आहेत. आदिवासी बांधवांसाठी सर्वाधिक हिताचे निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात झाले. याआधी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळांचे हाल काय होते हे महाराष्ट्र पहिलेय. देवेंद्रजी फडणवीस यांचे सरकार आल्यापासून आदिवासी, ओबीसी, मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे उत्तम शैक्षणिक करिअर घडवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु दुर्दैवानं आपल्या मुलांचे राजकीय भविष्य घडवण्यासाठी आंदोलनाचे इव्हेंट करत विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे.

राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांना सवाल आहे की ज्या आश्रमशाळेत तीन विद्यार्थिनींचे दुर्दैवानं सर्पदंशाने मृत्यू झाले ती आश्रमशाळा चालवणाऱ्या काँग्रेसच्या माजी खासदार - आमदारावर काय कारवाई केलीत? त्याबद्दल राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ चकार शब्दाने बोलायला तयार नाहीत. महाराष्ट्रातल्या सर्वाधिक आश्रमशाळा या काँग्रेसच्या नेत्यांच्या आहेत. काँग्रेसने आश्रमशाळा आंदण देऊन या नेत्यांची करिअर घडवली आहेत. आज त्या सगळ्या आश्रम शाळांमध्ये अनागोंदी सुरु आहे आणि त्या सगळ्यावर सरकार कारवाई करते आहे, असा हल्ला श्री. बन यांनी केला.

रिक्षाचालकांमध्ये अनेक ज्येष्ठ रिक्षाचालक आहेत. ते रिक्षाचालक फार शिकलेले नसतात. म्हणून या रिक्षाचालकांना मराठी यावी यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतला. जनाब संजय राऊत, बांबूचीच भाषा करायची असेल तर विधानसभेला, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला कसा बांबू लागला हे महाराष्ट्रातल्या जनतेने बघितले आहे. त्याबाबत आत्मचिंतन केलेत तर दोन्ही हाताने बोंब मारायची वेळ तुमच्यावर, तुमच्या पक्षाप्रमुखावर आणि उबाठा गटावर येईल, असाही भडिमार श्री. बन यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande