
अमरावती, 28 ऑगस्ट (हिं.स.)।
वन विभागातील महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपवताना ज्येष्ठता आणि पात्रतेला बगल देऊन 'वैयक्तिक समीकरणांना' प्राधान्य दिले जात असल्याची धक्कादायक चर्चा सध्या वन वर्तुळात रंगली आहे. अनेक महत्त्वपूर्ण आणि धोरणात्मक पदांचा कार्यभार मोजक्याच अधिकाऱ्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने, वन विभागात नक्की चाललंय काय?, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या वन विभागातील अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या पदांची सूत्रे केवळ दोन ते तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडेच एकवटली आहेत. नागपूर येथील पूर्व वनजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक मुकुल त्रिवेदी यांच्याकडे सध्या एपीसीसीएन (संवर्धन), एपीसीसीएफ (मानव संसाधन व्यवस्थापन), एपीसीसीएफ (कॅम्पा) या अत्यंत महत्त्वाच्या पदांसह ‘महाराष्ट्र इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड’च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. एकाच अधिकाऱ्याकडे एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या सोपविल्याने मूळ पदाच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुसरीकडे, वन दलाचे प्रमुख एम. श्रीनिवास राव यांनी देखील अनेक महत्त्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार स्वतःकडेच ठेवला आहे. यामध्ये एपीसीसीएफ (अर्थसंकल्प, नियोजन आणि विकास) आणि पीसीसीएफ (कर्मचारी वर्ग-पर्सनल) या पदांचा समावेश आहे. इतकेच नव्हे तर, वन विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘वन विकास महामंडळाच्या’ व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही राव हेच सांभाळत आहेत.
या अतिरिक्त कार्यभाराच्या वाटपामध्ये एक ठळक आणि विशिष्ट पद्धत दिसून येत असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या पदांचा कार्यभार वन दल प्रमुखांनी एकतर स्वतःकडे ठेवला आहे किंवा ज्यांच्याशी त्यांचे ‘मधुर’ कार्यसंबंध आहेत, अशाच मोजक्या अधिकाऱ्यांकडे तो सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात तीव्र नाराजी पसरली असून, हे वाटप ज्येष्ठता, अनुभव आणि पात्रतेनुसार समतोल व वस्तुनिष्ठ पद्धतीने न होता केवळ वैयक्तिक समीकरणांवर आधारित असल्याचा आभास निर्माण होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी