गोलाई शाळेच्या आवारात बिबट्याच्या पायांचे ठसे, संरक्षक भिंतीसह वनविभागाची गस्त वाढविण्याची मागणी
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)। गोलाई येथील माध्यमिक विद्यालय परिसरात वाघसदृश्य वन्यप्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमिक विद्यालय गोलाईचे मुख्याध्यापक अतुल माहिंद यांच्या माह
गोलाई शाळेच्या आवारात बिबट्याच्या पायांचे ठसे संरक्षक भिंतीसह वनविभागाची गस्त वाढविण्याची मागणी


अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

गोलाई येथील माध्यमिक विद्यालय परिसरात वाघसदृश्य वन्यप्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माध्यमिक विद्यालय गोलाईचे मुख्याध्यापक अतुल माहिंद यांच्या माहितीनुसार, शाळा परिसरात वन्यप्राण्यांच्या पायांच्या खुणा आढळल्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. हे ठसे बिबट्या किंवा वाघाचे असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, गोलाईलगतच्या मोथाखेडा गावातही बिबट्या दिसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.

शाळेच्या परिसराला संरक्षकभिंत नसल्याने वन्यप्राण्यांचा शाळेच्या आवारात प्रवेश होण्याची शक्यता आहे. याबाबत यापूर्वीही शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप संरक्षकभिंतीचे काम झालेले नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेला तातडीने संरक्षकभिंत मंजूर करून बांधावी, अशी मागणी मुख्याध्यापक अतुल माहिंद यांनी केली आहे. तसेच वनविभागाने परिसरात नियमित गस्त वाढवून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande