मोहन भागवतांनी देशातील नेत्यांना मार्गदर्शन करावे - अरविंद सावंत
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेत बोलण्यापेक्षा देशातील नेत्यांना मार्गदर्शन करावे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यम
मोहन भागवतांनी अमेरिकेपेक्षा देशातच बौद्धिक द्यावे; मराठा आरक्षणावरून अरविंद सावंतांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल


अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)।

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेत बोलण्यापेक्षा देशातील नेत्यांना मार्गदर्शन करावे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला.मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. सत्तेसाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेच्या राजकारणासाठी कुठेही जाणाऱ्या लोकांना मराठा समाजाच्या प्रश्नांबद्दल संवेदना नसल्याचा आरोप त्यांनी केला.मनोज जरांगे यांची मागणी कालची नसताना त्यांना वारंवार उपोषण करण्याची वेळ का येते, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. सरकारकडून आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात मागण्यांची पूर्तता होत नसल्याने जरांगे यांना पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे ते म्हणाले.

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा वाढविण्याची गरज असल्याचे सांगत सावंत म्हणाले की, तामिळनाडूमध्ये 67 टक्के आरक्षण आहे. महाराष्ट्रातही ही मर्यादा वाढविल्यास मराठा समाजासह इतर दुर्लक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना न्याय देता येईल.

राज्यात जातीपातीत समाजाला विभागून सत्तेचे राजकारण सुरू असल्याचा आरोप करत सावंत यांनी मतदारांनी सावध राहण्याचे आवाहन केले. विशेषतः ‘लाडक्या बहिणींनी’ सरकारच्या आश्वासनांकडे सजगतेने पाहावे, असेही ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande