
ठाणे, 30 ऑगस्ट (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या उपक्रमातून आज नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन केले. राज्यात ठाणे शहर मतदारसंघात आमदार संजय केळकर यांना उपक्रमाच्या आयोजनाचा मान देण्यात आला. ब्राह्मण सभा हॉल येथे आयोजित या उपक्रमास शहरातील विविध स्तरातील घटकांचा मोठ्या संख्येने सहभाग पाहायला मिळाला.
ठाणे शहरात आमदार संजय केळकर हे नशामुक्त ठाणे शहर ही चळवळ नागरिकांच्या सहभागातून राबवत आहेत. या कार्याला अधोरेखित करणारा सन्मान श्री. केळकर यांना प्राप्त झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या उपक्रमातून नशामुक्त भारत अभियानाचे आवाहन केले. याचे आयोजन करण्याचा मान ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात आमदार संजय केळकर यांना मिळाला. ठाणे स्टेशन रोडवरील ब्राह्मण सभा हॉल येथे रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता श्री. केळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १३७व्या 'मन की बात' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी कोकण पदवीधर मतदार संघांचे आमदार निरंजन डावखरे, आमदार अमित गोरखे, नगरसेविका उषा वाघ, नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी, अमित सरय्या, मंडल अध्यक्ष रोहित गोसावी, विशाल वाघ, नितीन ढमाले यांच्यासह घरेलू कामगार, कोळी समाज, मुस्लिम समाज, व्यापारी वर्ग, मागासवर्गीय समाज अशा विविध घटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना श्री. केळकर म्हणाले, मन की बात या उपक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नशामुक्त भारताचे आवाहन केले, याची गरज प्रत्येक कुटुंबाला, समाजाला आणि देशाला सुद्धा आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरू केले आणि त्याचे रूपांतर चळवळीत झाले आणि त्याला मोठे यश मिळाले तसेच नशामुक्त भारत अभियान राबवू, असा संकल्प आपण सारे करू. घराघरात, मनामनात हे अभियान पोहोचले पाहिजे. सुदृढ मन, शरीर आणि बुध्दी स्वतःच्या, समाजाच्या, शहराच्या आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक असल्याने आपण सारे ही चळवळ जनतेच्या सहभागातून पूढे नेऊ, असे आवाहन श्री. केळकर यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर