
अमरावती, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
मूर्तींच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांची वाढ, गणेशमूर्तींची निर्मिती अंतिम टप्प्यात
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना यंदा महागाईची झळ गणपतीच्या मूर्तींनाही बसणार आहे. युद्धजन्य परिस्थिती, कच्चा माल, रंग, वाहतूक तसेच उत्पादन खर्चात वाढ झाल्याने गणेशमूर्तींच्या किमतीत सुमारे २० ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गणेशमूर्तींच्या निर्मितीला वेग आला असून, शिरजगावबंड येथील रताडे परिवाराच्या मूर्तीनिर्मितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. शिरजगावबंड येथील गणेशमूर्तींची अमरावती जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरही मोठी मागणी आहे. आकर्षक, सुंदर आणि रेखीव मूर्ती तयार करण्यासाठी रताडे परिवाराने विशेष ओळख निर्माण केली आहे. लहान आकाराच्या मूर्तींपासून तब्बल १५ फुटांपर्यंतच्या मोठ्या गणेशमूर्ती येथे तयार केल्या जातात. अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला यांसह विविध जिल्ह्यांतून गणेश मंडळांकडून या मूर्तींना मागणी असते. गणेशमूर्ती तयार करणे हा रताडे परिवाराचा पिढीजात व्यवसाय आहे. बजरंगी रताडे यांनी या व्यवसायाची सुरवात केली. त्यावेळी त्यांच्या पत्नी शकुंतला रताडे यांनीही त्यांना साथ दिली. गेल्या अनेक वर्षांपासून परिवाराने गणेशमूर्ती कलेची परंपरा जपली आहे. आता परिवारातील मंगेश, भूषण, सूरज, रामभाऊ, श्याम, प्रकाश, गजेंद्र, विजय आदी सदस्य या व्यवसायात सक्रियपणे सहभागी आहेत. परिवारातील प्रत्येक सदस्य मूर्ती तयार करण्यापासून ते रंगरंगोटीपर्यंतच्या विविध कामांत हातभार लावतो. दरवर्षी एप्रिल महिन्यापासून गणेशमूर्ती तयार करण्यास सुरवात केली जाते.
मातीची निवड, साचा तयार करणे, मूर्तीला आकार देणे, नक्षीकाम, वाळवणे आणि त्यानंतर रंगरंगोटी अशा विविध टप्प्यांतून मूर्ती आकाराला येते. गणेशोत्सवासाठी आता केवळ पंधरा दिवस शिल्लक राहिल्याने मूर्तीनिर्मितीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मोठ्या आकाराच्या अनेक मूर्ती जवळपास तयार झाल्या असून, सध्या त्यांची रंगरंगोटी व अंतिम सजावटीचे काम वेगाने सुरू आहे. मोठ्या गणेशमूर्तींसाठी विविध गणेश मंडळांकडून आगाऊ नोंदणी केली जाते. त्यामुळे मंडळांच्या मागणीनुसार मूर्ती तयार करून देण्याचे नियोजन मूर्तिकारांकडून आधीच केले जाते. दुसरीकडे, लहान आकाराच्या गणेशमूर्ती विक्रीसाठी विविध गावांतील दुकानदार शिरजगावबंड येथून मूर्ती घेऊन जात आहेत. त्यामुळे सध्या रताडे परिवाराच्या कार्यशाळेत मूर्तीनिर्मिती आणि मूर्ती घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची लगबग वाढली आहे. यंदा मात्र कच्चा माल, रंग, वाहतूक आणि इतर साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम गणेशमूर्तींच्या निर्मिती खर्चावर झाला आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तींच्या किमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होणार असल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे. उत्पादन खर्च वाढला असला तरी गणेशभक्तांचा उत्साह मात्र कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी