
सोलापूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)। पीक पाहणीत अचूकता आणण्याबरोबरच शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणीची कटकट दूर करण्यासाठी राज्य शासनाने पीक पाहणीची पद्धत बदलली आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांची पाहणी आता सहाय्यकांमार्फत करण्यात येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन पद्धतीने पीक पाहणीची नोंद केली जात होती. ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना तांत्रिक आणि अन्य अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अनेक शेतकरी पीक नोंदणीपासून वंचित राहत होते. तसेच शेतात प्रत्यक्ष असलेले पीक आणि ऑनलाइन करण्यात आलेल्या नोंदीमध्येही अनेकदा तफावत आढळून येत होती. प्रशासनाकडून आवाहन आणि पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने पीक पाहणीची जबाबदारी बदलली आहे.
ई-पीक पाहणीची जागा आता सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हेने घेतली आहे. शेतातील पिकांची अचूक नोंद करण्यासाठी कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजीविका अभियानातील कर्मचारी यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.या सर्वेक्षणात शेतातील पिके, जिरायत-बागायत क्षेत्र, विहिरी, बोअरवेल आदींची नोंद करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतावर जाऊन सर्वेक्षण करून त्याची माहिती नव्या सर्व्हरवर नोंदवली जाणार आहे.दरम्यान, दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासकीय मदत मिळण्यासाठी संबंधित पिकांची नव्या प्रणालीवर नोंद असणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे पीक पाहणीची नवीन व्यवस्था शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरण्याबरोबरच पीक नोंदणी अधिक अचूक होण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड