
छत्रपती संभाजीनगर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथे समृद्धी महामार्गालगत गेल कंपनीच्या गॅस वाहिनीला गळती लागली. संभाव्य धोका टाळण्यासाठी हडस पिंपळगाव ते माळीवाडा दरम्यान सुमारे ३० किलोमीटरची वाहतूक धुळे-सोलापूर महामार्गावर वळवण्यात आली. गॅस गळतीची माहिती मिळताच प्रशासन, गेल कंपनीचे अधिकारी आणि अग्निशमन पथके घटनास्थळी दाखल झाली. मुंबईकडील वाहतूक हडस पिंपळगाव इंटरचेंजवरून, तर नागपूरकडील वाहतूक माळीवाडा इंटरचेंजवरून पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. गॅस वाहिनीचे व्हॉल्व्ह बंद करून गळती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, वाहतूक वळवल्याने धुळे-सोलापूर महामार्गावर वाहनांची गर्दी झाली. गळती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis