
सोलापूर, 30 ऑगस्ट (हिं.स.)।
परिवहन महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. या कार्डच्या नोंदणीची अंतिम मुदत मंगळवार, १ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यामुळे कार्ड नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.शासनाच्या लाडक्या बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना महामंडळाच्या बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक राहणार आहे. साध्या बसपासून शिवाईपर्यंत महामंडळाच्या विविध बससेवांमध्ये सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.यापूर्वी स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ३१ जुलै ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक महिला तसेच ज्येष्ठ आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांनी अद्याप कार्डसाठी नोंदणी केलेली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर महामंडळ आणि शासनाने नोंदणीची मुदत वाढवून १ सप्टेंबरपर्यंत केली.मुदत वाढवूनही अद्याप अनेक पात्र लाभार्थी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याबाबत उदासीन असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सवलतीच्या प्रवासाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मुदत संपण्यापूर्वी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड