गणेशोत्सवाकरिता रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन यंत्रणेला सज्जतेचे निर्देश
रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । गणेशोत्सवात जिल्हावासीयांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते
गणेशोत्सव आढावा बैठक


रत्नागिरी, 31 ऑगस्ट (हिं.स.) । गणेशोत्सवात जिल्हावासीयांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन यंत्रणेने सज्ज राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आज दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते.

गणेशोत्सवासाठी कोकणात येणारे जिल्हावासीय व स्थानिक नागरिकांना रिक्षाची वाढीव दर आकारणी, सीएनजी तुटवडा किंवा घाट रस्त्यांवरील वाहतूक कोंडी यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करत चोख नियोजन करावे. विशेषतः प्रवाशांची फसवणूक टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक रिक्षा स्टँडवर अधिकृत दरपत्रकाचे फलक लावावेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महामार्ग व घाट रस्ते सुरक्षा: कशेडी ते खारेपाटण (मुंबई-गोवा महामार्ग) तसेच मिऱ्या-कोल्हापूर महामार्गावर महामार्ग पोलीस, NHAI, उपविभागीय अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करावी. रस्त्यांवर योग्य ठिकाणी दिशादर्शक फलक व रेडियम लावावेत. घाट मार्गावर दरड कोसळणे, झाड पडणे किंवा अपघाताच्या घटना टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. रेल्वे गाड्यांच्या वेळा लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बस फेऱ्यांचे नियोजन करावे. आरटीओ विभागाने रिक्षा चालकांची तातडीने बैठक घेऊन रिक्षा मीटर तपासणी पूर्ण करावी आणि प्रवाशांच्या माहितीसाठी प्रत्येक स्टँडवर भाडे दरपत्रक प्रदर्शित करावे. महावितरणने उत्सवादरम्यान अखंडित वीजपुरवठा ठेवावा, तसेच जिल्ह्यात सीएनजी पंपांवर वाहनांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. अन्न व औषध प्रशासनाने बाजारातील मिठाई व प्रसादाचा दर्जा तपासावा. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी विसर्जन घाटांवर कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलशांची पुरेशी व्यवस्था करावी.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. उत्सवाच्या काळात कोणत्याही स्तरावर हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी आपले मोबाईल बंद ठेवू नयेत व सतत संपर्कात राहावे, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस सहायक पोलीस अधीक्षक आरांक्षा यादव, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande