
रायगड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धानाची विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. रविंद्र शेळके यांनी केले आहे. ऑनलाइन नोंदणीसाठी १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मुदत देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला हमी भावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी केली जाते. या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी राज्यात धान व भरडधान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
शासनाकडे धान विक्री करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष धान विक्री करण्यापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना आधारकार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा क्रमांक देणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांकडे AGRISTACK संकेतस्थळावरील फार्मर आयडी (शेतकरी क्रमांक) असणे आवश्यक आहे.
सन २०१६-१७ पासून विकेंद्रीत खरेदी योजना राज्यभर राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व माहितीची पूर्तता करून १५ ऑक्टोबरपूर्वी संबंधित धान खरेदी केंद्रावर ऑनलाइन नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)