
लातूर, 31 ऑगस्ट (हिं.स.)।
चाकूर शहरातील बोथी रोड परिसरातील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून कॉपर वायर चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत चाकूर पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
याप्रकरणी पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २८७/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता तसेच गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९३/२०२६, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्यात फिर्यादी लक्ष्मण राजेंद्र केराळे, रा. चाकूर यांनी बोथी रोडवरील त्यांच्या इलेक्ट्रॉनिक दुकानाचे कुलूप व दुकान फोडून आतील कॉपर वायर अज्ञात व्यक्तींनी चोरी करून नेल्याची फिर्याद चाकूर पोलिसांत दिली होती.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चाकूर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीस गेलेला मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादीला परत केला. आज दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस ठाणे चाकूर येथे फिर्यादी लक्ष्मण राजेंद्र केराळे यांना १ लाख १५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करून तो फिर्यादीला परत मिळवून देण्यात चाकूर पोलिसांना यश आल्याने पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis