रेपो रेट स्थिर; कर्ज घेणाऱ्यांचा ईएमआय जैसे थे..
मुंबई, ५ ऑगस्ट (हिं.स.) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्वसामान्य नागरिक आणि कर्जदारांना दिलासा दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण पुनरावलोकन बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे म
Rbi


मुंबई, ५ ऑगस्ट (हिं.स.) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्वसामान्य नागरिक आणि कर्जदारांना दिलासा दिला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या द्वैमासिक पतधोरण पुनरावलोकन बैठकीत व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुख्य रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या निर्णयामुळे गृह, वाहन किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांच्या ईएमआय (EMI) मध्ये कोणतीही वाढ किंवा घट होणार नाही.

पत्रकार परिषदेत बोलताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की, पतधोरण समितीची (MPC) चालू आर्थिक वर्षातील तिसरी द्वि-मासिक बैठक 'पॉलिसी रेपो रेट'बाबत चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी झाली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चितता आणि घडामोडींमुळे महागाईवर ताण निर्माण झाला आहे. इंधनाचे वाढते भाव आणि हवामानातील बदलांमुळे किरकोळ व घाऊक महागाईत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व आव्हानांचा सामना करणे आणि अर्थव्यवस्थेत संतुलन राखण्यासाठी व्याजाचे दर सध्या स्थिर ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त आहे. प्रामुख्याने अन्न आणि इंधनाच्या किमतींमुळे, मुख्य महागाई नजीकच्या काळात आणखी वाढेल आणि 2027 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ती उच्चांक गाठेल, त्यानंतर ती नियंत्रणात येईल. मौल्यवान धातू वगळता, महागाई नियंत्रणात असून पूर्वीच्या अंदाजांनुसारच असल्याचे मल्होत्रा यांनी सांगितले.

आरबीआयने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठीचा आपला जीडीपीचा अंदाज पूर्वीच्या 6.6 टक्क्यांवरून वाढवून 6.7 टक्के केला आहे. या व्यतिरिक्त, आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीसाठी (Q1) जीडीपी वाढीचा अंदाज ६.६ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे, तर दुसऱ्या तिमाहीसाठीचा (Q2) अंदाज ६.३ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, चालू वर्षात किरकोळ महागाईचा दर (CPI) ४.९ टक्क्यांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. जागतिक पातळीवरील मध्यवर्ती बँकांचे कडक पतधोरण पाहता आरबीआय आगामी काळात काळजीपूर्वक पावले उचलेल.

'इक्विरस सिक्युरिटीज'चे संशोधन प्रमुख मौलिक पटेल यांच्या मते, आगामी डिसेंबर महिन्यातील पतधोरण पुनरावलोकनात आरबीआय रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची (०.२५%) वाढ करण्याची शक्यता आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande