
अकोला, 07 ऑगस्ट (हिं.स.)।
पवित्र वर्षावासानिमित्त कपिलवस्तू नगर येथील वर्षा इंगळे व प्रवीण इंगळे यांच्या वतीने पूज्य भदंत श्रीलाभ थेरो यांच्या जयंतीनिमित्त डाबकी रोडवरील लुंबिनी नगर येथील लुंबिनी बुद्ध विहारात विशेष धम्मकार्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या अमूल्य धम्मग्रंथाच्या १०० प्रती धम्मदान स्वरूपात उपस्थितांना मोफत वितरित करण्यात आल्या.
या कार्यक्रमास लुंबिनी नगर परिसरातील मोठ्या संख्येने उपासक, उपासिका तसेच धम्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. आयोजकांनी वर्षावासाच्या पवित्र काळात धम्मग्रंथाच्या १०० प्रतींचे वितरण करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार पूज्य भदंत श्रीलाभ थेरो यांच्या जयंतीनिमित्त हा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना पूज्य भदंत श्रीलाभ थेरो म्हणाले की, बौद्ध परंपरेत धम्मदान हे सर्वश्रेष्ठ पुण्यकर्म मानले जाते. “सब्बदानं धम्मदानं जिनाति” म्हणजेच सर्व दानांमध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे. वर्षावासाच्या या पवित्र कालावधीत धम्मग्रंथांचे वितरण हे समाजात ज्ञान, सद्भावना आणि प्रज्ञेचा प्रसार करणारे महत्त्वपूर्ण कार्य असल्याचे त्यांनी सांगितले. या धम्मदान उपक्रमाचा उद्देश समाजात बौद्ध धम्माची शिकवण, करुणा, समता आणि प्रज्ञेचा प्रसार करणे तसेच नागरिकांना धम्मग्रंथांच्या अभ्यासासाठी प्रेरित करणे हा आहे. वर्षावासाच्या या पुण्यकाळात अधिकाधिक नागरिकांनी अशा धम्मकार्यांत सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे