
वर्धा, 07 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा ठिय्या आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पोलिसांनी याकडे लक्ष वेधत जनावरांच्या मालकांविरोधात गु्न्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रारंभी अनोळखी व्यक्तीविरोधात तर जनावरांच्या मालकाची ओळख पटल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. शहरात पेट्रोलिंगकरिता गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार अभिजित वाघमारे, महेंद्र पाटील, रणजित भुरसे, अमोल साळवण असे निघाले होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मुख्य मार्गावर एक पाढऱ्या रंगाची कालवड, एक काळ्या रंगाचा गोऱ्हे, कोणतीही देखरेख किंवा नियंत्रण नसताना सार्वजनिक रस्त्यावर मोकाट बसून दिसून आले. जनावरांमुळे सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. वाहन चालकाना अचानक वाहने वळवावी लागत होती. पादचार्याच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता. मोकाट जनावरे याना अनोळखी व्यक्तीने स्वत:च्या ताब्यातील जनावरांवर आवश्यक नियंत्रण न ठेवता ती सार्वजनिक रस्त्यावर मोकाट सोडून सार्वजनिक सुरक्षिततेला धोका निर्माण केला तसेच त्याची कोणतीही अन्न, पाणी, निवारा न देता त्याना उपासमारी, तहान, अनावश्ययक वेदना किंवा त्रास होईल अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक सोडून दिल्याचे दिसून आले आहे. सदर मोकाट जनावरांच्या अनोळखी मालकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणे असल्याने अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने वाहतूक नियंत्रण शाखा येथील सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार घुले, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, हवालदार किशोर पाटील, हवालदार आशीष देशमुख यांनी पंचाच्या सहायाने पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहायाने ही जनावरे राधाकृष्ण बजाज गौशाळेची रुग्णवाहिका बोलावून जनावरांना पिपरी येथील करुणाश्रमात सोडण्यात आले.
-------------------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी