वर्ध्यात अखेर सुसज्ज नाट्यगृहाचा मार्ग मोकळा
वर्धा, 07 ऑगस्ट (हिं.स.) महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र, शहरात हक्काचे आणि सुसज्ज नाट्यगृह नसल्याने स्थानिक कलारसिकांची मोठी गैरसोय होत होती. वर्धेकरांच्या या अने
वर्ध्यात अखेर सुसज्ज नाट्यगृहाचा मार्ग मोकळा


वर्धा, 07 ऑगस्ट (हिं.स.) महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्याला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. मात्र, शहरात हक्काचे आणि सुसज्ज नाट्यगृह नसल्याने स्थानिक कलारसिकांची मोठी गैरसोय होत होती. वर्धेकरांच्या या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागणीची दखल घेत, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नाट्यगृह उभारणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या कामाला गती देण्यासाठी त्यांनी नुकतीच सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट घेऊन आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. शहरातील बसस्थानकालगतच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात नाट्यगृह उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाला सांस्कृतिक कार्य विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ व ३० जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली होती. मात्र नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे नाट्यगृहाचे काम सुरू होऊ शकले नाही. २२ ऑगस्ट २०२५ रोजी आशिष शेलार वर्धा येथे आले असता त्यांनी नाट्यगृहासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाने जागेच्या उपलब्धतेनुसार अंदाजपत्रक तयार करून मुख्य अभियंता यांच्या तांत्रिक सहमतीसह जिल्हाधिकारी यांनी सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेकरिता १ जून २०२६ रोजी शासनाकडे सादर केला आहे. तथापि, नाट्यगृहाच्या कामास प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आशिष शेलार यांच्याकडे केली. मागणीच्या अनुषंगाने शेलार यांनी सांस्कृतिक विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने मंजुरी देण्याचे निर्देश दिले.

४२ कोटी ६६ लाखांचा प्रस्ताव

महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरात नाट्यगृहाची निर्मिती करण्यात येणार आहे. १२०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह राहणार असून यासाठी ४२ कोटी ६६ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. ४३७५.९२० चाै. मीटरमध्ये नाट्यगृहाची निर्मिती होणार असून सुसज्ज असे नाट्यगृह राहणार आहे. लोअर ग्राऊंड फ्लोअर ४२८.९७० चाै. मी., ग्राऊंड फ्लोअर २८१२.२८० चाै. मी. व फर्स्ट फ्लोअर ११३४.६७० चाै. मीटरचा राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande