विद्यार्थ्यांचा आगार व्यवस्थापकांना घेराव; सर्कसपूर बसफेरी पुन्हा कोलमडल्याने आक्रोश
वर्धा, 07 ऑगस्ट (हिं.स.) दिलेला शब्द न पाळल्याने आणि आर्वी ते सर्कसपूर मार्गावरील सकाळी १० वाजताची एसटी बस गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा अनियमित झाली. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज आगारात धडक दिली. निखिल कडू यांच्या नेतृत्वात विद्य
विद्यार्थ्यांचा आगार व्यवस्थापकांना घेराव सर्कसपूर बसफेरी पुन्हा कोलमडल्याने आक्रोश


वर्धा, 07 ऑगस्ट (हिं.स.) दिलेला शब्द न पाळल्याने आणि आर्वी ते सर्कसपूर मार्गावरील सकाळी १० वाजताची एसटी बस गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा अनियमित झाली. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज आगारात धडक दिली. निखिल कडू यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापक अनंत ताटर यांच्या दालनात ठिय्या मांडून थेट घेराव घातला. वेळ मारून नेण्यासाठी प्रशासनाने खोटे आश्वासन देऊ नये, ठरल्याप्रमाणे बस वेळेवरच आली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेत निखिल कडू यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी प्रशासनाला धारेवर धरले. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने सर्कसपूर बसफेरी पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते. तशी बस सुरूही झाली होती, परंतु काही दिवसानंतर त्याला ग्रहण लागले. गेल्या चार-पाच दिवसांपासून ही सेवा पुन्हा बिघडल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे. घेराव आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आपली कैफियत मांडताना एसटी वेळेवर येत नसल्यामुळे आम्हाला शाळेत पोहोचायला उशीर होतो आणि उशिरा आल्यामुळे शिक्षक आम्हाला वर्गात प्रवेश देत नाहीत, असे सांगितले.

बसच्या अनागोंदी कारभारामुळे रोजची होणारी मानसिक घुसमट आणि अभ्यासाचे होणारे नुकसान सांगताना विद्यार्थिनींचे डोळे पाणावले होते. विद्यार्थ्यांचा हा तीव्र आक्रोश पाहून आगार व्यवस्थापक ताटर यांनी आगारातील बसेसची उपलब्धता आणि उपलब्ध मनुष्यबळ यांच्यातील असमतोलाची खंत व्यक्त केली. बसेस आहेत तर चालक-वाहक नाहीत आणि चालक-वाहक आहेत तर बसेस उपलब्ध नाहीत, अशी अडचण मांडली. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

---------------------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande