
राज्यातील काँग्रेस सरकारने जारी केले फर्मान
बंगळुरू, 10 सप्टेंबर (हिं.स.) : कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व सरकारी कार्यक्रम आणि अधिकृत समारंभांमध्ये राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य केले आहे. मात्र, राजकीय आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ दोन कडवी गायली जावीत, असे निर्देश सरकारने जारी केले आहेत.
कर्नाटक सरकारच्या आदेशानुसार, राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल तसेच केंद्र सरकारच्या प्रतिनिधींची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची सर्व 6 कडवी गायली जाणार आहेत. इतर सरकारी कार्यक्रम आणि समारंभांमध्ये मात्र केवळ पहिली दोन कडवी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’ची सर्व 6 कडवी गाणे अनिवार्य करण्याच्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारचा हा आदेश महत्त्वाचा मानला जात आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात ‘वंदे मातरम्’ने राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता आणि देशभक्तीची भावना वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, काँग्रेस कार्यसमितीने गेल्या महिन्यात 1937 मध्ये पक्षाने घेतलेल्या निर्णयाचे पालन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी गायली जाणार आहेत. गेल्या 8 सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या सरकारी आदेशानुसार, केंद्रीय गृह मंत्रालयाने ‘वंदे मातरम्’च्या अधिकृत आवृत्तीबाबत तसेच विविध सरकारी आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्याचे गायन किंवा वादन करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. संबंधित प्रसंगानुसार या सूचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
राज्यात आयोजित विविध सरकारी कार्यक्रम आणि समारंभांचे स्वरूप व प्रसंग लक्षात घेऊन ‘वंदे मातरम्’च्या गायन किंवा वादनामध्ये एकरूपता, सन्मान आणि योग्य शिष्टाचार म्हणजेच प्रोटोकॉल राखणे आवश्यक असल्याचे कर्नाटक सरकारने आदेशात स्पष्ट केले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी