
भंडारा, 11 सप्टेंबर (हिं.स.)। भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन लहान बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेत 9 जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक परिसरातील भाऊ ढाब्याजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
छत्तीसगडमधील १९ महिला आणि इतर प्रवासी धार्मिक कार्यासाठी पिकअप वाहनातून छत्तीसगडहून नागपूरच्या दिशेने निघाले होते. पिंपळगाव येथील मोटघरे पेट्रोल पंप आणि भाऊचा ढाबा यांच्यामधील रस्त्यावर पेट्रोल पंपावरून एक ट्रक बाहेर आला. यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाच्या चालकाला वाहनावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यामुळे पिकअप थेट ट्रकच्या मागील भागावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
या अपघातात आठ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मृतांमध्ये जामबाई रामावतार वर्मा (५०), मीनाक्षी राजकुमार वर्मा (२६), धैर्य रुपेश उईके (४), स्वीटी रुपेश उईके (६), गायत्री रुपेश उईके (३०), गणेशिया अरावत पटेल (२२) आणि सरिता विजय वर्मा (३०) यांचा समावेश आहे. याशिवाय दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही.
जखमींमध्ये गुलशन रमेश वर्मा (२२), ललिता योगेश पटले (२६), तन्मय योगेश पटले (४), डॉली अरावत पटेल (४), सुखी यारी पटेल (२०), राजकुमारी पटेल (५७), रमैया पटेल (३०), दरिया पटेल (७), सुभाष विजय वर्मा (५), रितेश विजय वर्मा (३) आणि मेधा राजकुमार वर्मा (३) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच गडेगाव महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रमुख रवींद्र रेवतकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सध्या भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये ३ बालकांवर तर उर्वरितांना नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आलं आहे. वाहन चालक हा या अपघातात वाचला असून त्याच्यावर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येत आहे. मन हेलावरून आणि पिळवटून टाकणारा अपघात घडला असून छोटे बालक यात आपल्या आईला पोरके झाल्याचं विदारक दृश्य भंडाऱ्यात बघायला मिळत आहे. घटनेचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule