
नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)।इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान भारतात दाखल झाले असून ते ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्यांची आजच महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठकही होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) शिखर परिषदेदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांची भेट घेतली होती. या प्रदेशात दीर्घकाळ शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचे मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
ब्रिक्स आणि एससीओसारख्या बहुपक्षीय संघटनांमध्ये इराणसोबत एकत्रितपणे काम करण्याची भारताची तयारी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. तसेच इराणसोबत द्विपक्षीय व्यापाराचे मार्ग वाढवणे आणि त्यामध्ये विविधता आणणे, यासाठी नवी दिल्ली कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विविध क्षेत्रांमध्ये असलेले ऐतिहासिक संबंध आणखी दृढ करण्याच्या भारताच्या भूमिकेवरही त्यांनी भर दिला.
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी १२ आणि १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्या अजेंड्यावर भाष्य केले. बहुपक्षीय कूटनीतीमुळे द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीला आणखी वेग मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बघाई म्हणाले, “ब्रिक्स शिखर परिषदेच्या निमित्ताने भारतासोबत परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये संवाद आणि विचारविनिमय सुरू ठेवण्याची संधी आम्ही निश्चितच वापरू.”
एससीओ शिखर परिषद आणि ब्रिक्ससारख्या प्रमुख बहुपक्षीय गटांमध्ये भारताची प्रभावी भूमिका असल्याचेही बघाई यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, “भारत हा शांघाय सहकार्य संघटना आणि ब्रिक्स या दोन्ही संघटनांचा सदस्य आहे.”बघाई म्हणाले, “भारत हा अशा देशांपैकी एक आहे, ज्यांच्यासोबत आमचे अनेक क्षेत्रांमध्ये चांगले संबंध आहेत. विशेषतः व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या बाबतीत हे संबंध महत्त्वाचे आहेत.”
विशिष्ट क्षेत्रांचा उल्लेख करताना त्यांनी कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांना, विशेषतः चाबहार बंदराला, दोन्ही देशांसाठी सर्वाधिक प्राधान्य असल्याचे सांगितले.ते म्हणाले, “सामान्यतः इराण आणि भारत यांच्यातील चर्चेत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाते. यामध्ये चाबहार बंदराचाही समावेश आहे, जे दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”ते पुढे म्हणाले, “एकूणच, मी सांगितल्याप्रमाणे, भारतासोबत आमचे संबंध अतिशय चांगले आहेत आणि ते सातत्याने अधिक दृढ होत आहेत.”
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode