टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता
फिजिओ कमलेश जैन नोटीस पीरियडवर नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग
Major changes likely in Team India's support staff


फिजिओ कमलेश जैन नोटीस पीरियडवर

नवी दिल्ली, 11 सप्टेंबर (हिं.स.)। भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघातील खेळाडूंच्या दुखापतीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अनेक प्रमुख खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत असल्याने संघाच्या नियोजनावर त्याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघाचे फिजिओ कमलेश जैन यांना पदावरून हटविण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

वृत्तानुसार, कमलेश जैन सध्या नोटीस पीरियडवर आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, अफगाणिस्तानविरुद्ध खेळणारा संघ हा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेला संघ आहे. त्यामुळे फिजिओ आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच संघासोबत जपानला जाणार आहेत. राष्ट्रीय निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे प्रमुख खेळाडूंच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींमुळे चिंतेत आहेत. त्यामुळे स्पोर्ट्स सायन्स टीममधील काही सदस्यांना संघासोबत पाठवणे आवश्यक ठरणार आहे. जैन हे फिजिओ असल्याने त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.

साडेचार वर्षांनंतर टीम इंडियाची साथ सोडणार?

कमलेश जैन यांनी जून 2022 मध्ये टीम इंडियाच्या फिजिओची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी राहुल द्रविड हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. जवळपास साडेचार वर्षे टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग राहिल्यानंतर आता जैन हे पद सोडणार असल्याचं समोर आलं आहे. फिजिओच्या पदासाठी करावी लागणारी सततची प्रवासाची धावपळ हे राजीनाम्यामागचं एक कारण असल्याचं मानलं जात आहे. याशिवाय, कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळेही त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, बीसीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये सलग तिसरा मोठा बदल

गेल्या काही आठवड्यांमध्ये टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठे बदल झाले आहेत. इंग्लंड दौरा संपल्यानंतर फील्डिंग कोच टी. दिलीप यांनी टीम इंडियाची साथ सोडली. त्यानंतर सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते आता कोलकाता नाईट रायडर्ससोबत जोडले गेले आहेत. आता कमलेश जैन यांचा राजीनामा हा टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमधील तिसरा मोठा बदल ठरणार आहे.

दरम्यान, दुखापतीतून सावरून वॉशिंग्टन सुंदरने संघात पुनरागमन केले आहे. मात्र, वेगवान गोलंदाज हर्षित राणा अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसोबतच आशियाई क्रीडा स्पर्धेतूनही बाहेर झाला आहे. बराच काळ संघाबाहेर राहिल्यानंतर राणाने इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघात पुनरागमन केले होते. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने संघात स्थान मिळवले; मात्र इंग्लंड दौऱ्यातच तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला.

जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांच्या दुखापतींबाबतही अद्याप स्पष्टता नाही. त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डीच्या दुखापतीमुळेही भारतीय संघाला अडचणींचा सामना करावा लागला आहे. प्रमुख खेळाडूंच्या सततच्या दुखापतींमुळे संघाच्या नियोजनावर परिणाम होत असल्याने बीसीसीआयने फिजिओ आणि स्पोर्ट्स सायन्स विभागाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याचे मानले जात आहे. त्यामुळे कमलेश जैन यांच्याबाबतचा निर्णय भारतीय संघाच्या आगामी नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande