वंदे मातरम वादावर उमर अब्दुल्लांची काँग्रेसला चपराक
देशातील कायदेशीर नियम पाळाण्याचा दिला सल्ला श्रीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.) : तुष्टीकरणासाठी ‘वंदे मातरम’च्या 6 कडव्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना चांगलेच खडसावले आहे.काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगो
उमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री जम्मू-काश्मीर


देशातील कायदेशीर नियम पाळाण्याचा दिला सल्ला

श्रीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.) : तुष्टीकरणासाठी ‘वंदे मातरम’च्या 6 कडव्यांना विरोध करणाऱ्या काँग्रेसला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना चांगलेच खडसावले आहे.काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी नॅशनल कॉन्फरन्सला दिलेल्या सल्ल्यावर उमर अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकारी कार्यक्रमांमध्ये संपूर्ण ‘वंदे मातरम’चे गायन करण्याबाबत देशभर समान नियम असल्याचे उमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.

उमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, राष्ट्रीय गीतासंदर्भात कायदेशीर नियम करण्यात आले असून सरकारी कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम’ची सर्व कडवी गाणे आवश्यक आहे. हा नियम केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नसून संपूर्ण देशात लागू आहे. सरकारी कार्यक्रमांसाठी हा प्रोटोकॉल असून त्याचे पालन न केल्यास कारवाई होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना उमर अब्दुल्ला यांनी आपल्या सहयोगी पक्षाला थेट सवाल केला. या मुद्द्यावर काश्मिरी नागरिकांना तुरुंगात पाठवायचे आहे का, असा प्रश्न त्यांनी काँग्रेसला उद्देशून उपस्थित केला.मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी नॅशनल कॉन्फरन्सची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पक्ष म्हणून आम्ही कधीही ‘वंदे मातरम’ स्वीकारलेले नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही. मात्र, देशातील कायदेशीर आवश्यकतांचे पालन करणे पक्षासाठी बंधनकारक असल्याचे त्यांनी नमूद केले.

के. सी. वेणुगोपाल यांच्या वक्तव्याने उद्भवला वाद

काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी 8सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांना ‘वंदे मातरम’ची 2 कडवी गाण्याचा सल्ला दिला होता. वेणुगोपाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘वंदे मातरम’ची संपूर्ण आवृत्ती भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या विविध आणि बहुविध विचारसरणीशी सुसंगत नाही. 1937 मध्ये काँग्रेसने स्वीकारलेल्या राष्ट्रीय गीताच्या आवृत्तीचा आदर करण्याचे आवाहन त्यांनी पक्षाच्या सहकाऱ्यांना केले.

श्रीनगरमधील कार्यक्रमानेही वेधले लक्ष

दरम्यान, श्रीनगर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला हे ‘वंदे मातरम’च्या संपूर्ण गायनादरम्यान उभे राहिले होते.गीताची सर्व 6 कडवी सुरू असताना अब्दुल्ला कुटुंबातील दोन्ही नेते उभे राहिल्याने ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावर इंडिया आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्समधील भूमिकांतील फरकही अधोरेखित झाला आहे.---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande