बीडमध्ये बुधवारी शेतकरी हक्क मोर्चाचे ‘हलगी बजाव’ आंदोलन
बीड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस यांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून हेक्टरी ए
शेतकऱ्यांचा एल्गार


बीड, 15 सप्टेंबर (हिं.स.) : दुष्काळसदृश परिस्थितीमुळे सोयाबीन, कापूस यांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करावा, पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी आणि प्रलंबित पीकविमा तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, या मागण्यांसाठी शेतकरी हक्क मोर्चाच्यावतीने बुधवार, दि. 16 सप्टेंबर रोजी ‘हलगी बजाव’ आंदोलन करण्यात येणार आहे.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी 10 वाजता हे आंदोलन होणार असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीड येथे पत्रकार परिषद घेऊन मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांची माहिती दिली.

सन 2020 मधील प्रलंबित पीकविमा तातडीने अदा करावा, अतिवृष्टीच्या काळात जाहीर केल्याप्रमाणे हेक्टरी 17 हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, तसेच चालू वर्षाचा पीकविमा मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी शेतकरी हक्क मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सुमारे 30 ते 35 गावांमध्ये बैठका घेतल्या आहेत. नाळवंडी, लिंबागणेश, नेकनूर, पाली, पिंपळनेर यांसह विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून आंदोलनाची माहिती देण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावागावातील शेतकरी हलगी (डफडे) वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल होणार आहेत. ‘दुष्काळ जाहीर करा, नुकसानभरपाई द्या आणि पीकविमा तात्काळ जमा करा’, असा आवाज या आंदोलनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविला जाणार आहे

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande