मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेड शहरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहि
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नांदेड शहरात प्रतिबंधात्मक आदेश


नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त १७ सप्टेंबर रोजी नांदेड शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये नांदेड शहरातील विविध भागांत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी हा आदेश जारी केला आहे. त्यानुसार उपोषण, आत्मदहन, धरणे, मोर्चा, रॅली, सत्याग्रह आदी आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महानगरपालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय नांदेड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा–महात्मा गांधी पुतळा परिसर, पोलीस अधीक्षक कार्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, वजिराबाद परिसर तसेच माता गुजरीजी विसावा उद्यान परिसर यांसह संबंधित भागात राहणार आहे.

तसेच शिवाजीनगर परिसर, आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, कुसुम सभागृह ते रेल्वे स्टेशनकडे जाणारा रोड, २६ नंबर रोड तसेच शासकीय विश्रामगृह ते एसटी ओव्हर ब्रिजकडे जाणारा रस्ता या परिसरातही आदेश लागू करण्यात आला आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अनुषंगाने विविध मागण्यांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातून उपोषणार्थी, आत्मदहनार्थी व आंदोलक येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. संबंधितांनी आदेशाचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande