नांदेड - बारड येथे १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विशेष कार्यक्रम
नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)। मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामपंचायत कार्यालय, बारड यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे
नांदेड - बारड येथे १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त विशेष कार्यक्रम


नांदेड, 15 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय संचार ब्यूरो नांदेड, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि ग्रामपंचायत कार्यालय, बारड यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर २०२६ रोजी बारड (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथे विविध विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामात बारड गावाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या मुक्तिसंग्रामात बारड येथील ३३ स्वातंत्र्यसैनिकांनी सहभाग घेऊन मोलाचे योगदान दिले. या शूर स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यासाठी बारड येथील हुतात्मा स्मारक येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘मराठवाडा मुक्तिसंग्राम छायाचित्र प्रदर्शन’ हे असणार आहे. या प्रदर्शनातून मुक्तिसंग्रामाची देदीप्यमान गाथा, हुतात्म्यांचे बलिदान, स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचा सहभाग तसेच मुक्तिसंग्रामातील शूरवीरांच्या योगदानाची माहिती नागरिकांना करून देण्यात येणार आहे.

याशिवाय जिल्हा परिषद हायस्कूल व कन्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागातून तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. शाहीर वाघमारे यांच्या पथकातर्फे देशभक्तिपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणही करण्यात येणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून नव्या पिढीला त्यांच्या योगदानाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, नांदेड आणि ग्रामपंचायत कार्यालय, बारड यांच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande