
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । विलवडे रेल्वेस्थानक संघर्ष समितीतर्फे येत्या रविवारी, दि. २० सप्टेंबर रोजी होणारे लाक्षणिक उपोषण शांततेच्या वातावरणात आणि कायदेशीर मार्गाने पार पाडण्याची ग्वाही पोलीस प्रशासनाला देण्यात आले.
विलवडे रेल्वे स्थानकातील नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लांजा पोलीस ठाण्यात संघर्ष समितीचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक आज झाली. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत उपोषणादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.उपोषण शांततामय आणि कायदेशीर मार्गाने पार पाडावे, तसेच रेल्वे प्रवासी, रेल्वे वाहतूक अथवा रेल्वे प्रशासनाच्या कामकाजाला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पोलिसांकडून संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या. उपोषणाच्या काळात वाद-विवाद, घोषणाबाजीमुळे निर्माण होणारे तणावपूर्ण प्रसंग अथवा अनुचित प्रकार टाळून पोलीस व रेल्वे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले.
बैठकीदरम्यान संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या मागण्या आणि संबंधित तक्रारींची माहिती पोलिसांनी जाणून घेतली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.बैठकीला विलवडे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अमोल रेडीज, उपाध्यक्ष भास्कर खामकर, संतोष चव्हाण, दीपक जानकर, सल्लागार सुभाष लाड, जगदीश राजापकर, प्रकाश तोरस्कर तसेच सदस्य तुषार पालकर, युवराज हांडे, विश्वनाथ गुरव, रवींद्र जानकर आणि दीपक तोरस्कर उपस्थित होते.पोलीस प्रशासनाला आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी संघर्ष समितीतर्फे देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी