
रत्नागिरी, 16 सप्टेंबर (हिं.स.) । हर्णै (ता. दापोली) येथील समुद्रकिनारी खवले मांजर मृतावस्थेत आढळून आले. हर्णै गावचे ग्रामस्थ फहाज जमादार यांनी याबाबत दापोली वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.
समुद्रकिनारी मृतावस्थेत पडलेल्या खवले मांजराची पाहणी केल्यानंतर त्याच्या शरीराचे सर्व अवयव सुव्यवस्थित असल्याची खात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक पाहणीत हे खवले मांजर उंच टेकडीवरून समुद्राच्या पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधिकारी प्रभू साबणे यांनी व्यक्त केला.वन विभागाने मृत खवले मांजर ताब्यात घेतले असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याबाबतचे पुढील वन विभागीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीमुळे ही घटना वन विभागाच्या निदर्शनास आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी