
पुणे, 17 सप्टेंबर (हिं.स.)।
विनयभंगाच्या प्रकरणात आरोपी संतोष पंडित यांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सरकारी पक्षाने जामीनाला विरोध करत मांडलेले मुद्दे आरोपीचा जामीन नाकारण्यासाठी पुरेसे नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
या प्रकरणात सरकारी पक्षाकडून आरोपीविरोधातील आरोपांची गंभीरता तसेच तपासाच्या अनुषंगाने विविध मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले. मात्र, उपलब्ध परिस्थितीचा विचार करता केवळ या आधारावर आरोपीला जामीन नाकारणे योग्य ठरणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार संतोष पंडित यांना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू राहणार आहे.
महिला नगरसेविका आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत युट्यूब व्हिडिओतून अश्लील व लैंगिक स्वरूपाची वक्तव्ये केल्याच्या आरोपावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. यू. वडगावकर यांनी बुधवारी पंडित याची २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले. तपासासाठी आरोपीला कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट करताना, सरकारी पक्षाने व्यक्त केलेल्या शंका केवळ काल्पनिक असून त्या जामीन नाकारण्यासाठी पुरेशा नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. जामिनावर सुटका करताना पंडित यांनी तक्रारदाराशी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संपर्क साधू नये, पुराव्यांशी छेडछाड करू नये, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
पंडित विरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात विनयभंग आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ३६ वर्षीय महिलेने पोलिसांकडे संतोष पंडीत याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर मनास लज्जा उत्पन्न झाल्याने फिर्याद दिल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून राज्यात चांगलेच वातावरण तापले होते. तक्रारीनुसार, २ सप्टेंबर रोजी त्यांनी पंडित याने युट्यूबवर अपलोड केलेला व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुणे महानगरपालिकेतील महिला नगरसेविकांबाबत अश्लील व लैंगिक स्वरूपाची वक्तव्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांबाबत अश्लील वक्तव्ये असलेले पंडितचे व्हिडिओ पाहिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु