
लातूर, 18 सप्टेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पावसाअभावी खरीप पिके करपून गेल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी देवणी तालुक्यातील लासोना येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्थानिक शेतकरी शिवाजी भोरे यांच्या शेतातील वाळलेल्या सोयाबीन पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. पेरणीनंतर तब्बल ५० ते ५५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून शेंगांमध्ये दाणे भरलेले नाहीत. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे करपून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
प्रति एकर सुमारे ३५ हजार रुपये खर्च करूनही उत्पादन हातात येण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मागील नुकसानीची मदत आणि विमा भरपाई अद्याप मिळालेली नसताना नव्याने निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा मोठा फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून जनावरांच्या चारा व पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत लातूर जिल्ह्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत ठराव मंजूर करून तो शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेऊन दुष्काळाच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाणार आहे. राज्य सरकारने कोणतीही चालढकल न करता तातडीने लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अभय साळुंके यांनी सांगितले की, आता कितीही पाऊस झाला तरी सोयाबीनची रास होणे शक्य नसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला असून चारा आणि पाण्याची परिस्थितीही बिकट होत आहे. शेतकरी व शेतमजुरांना तातडीने ठोस आर्थिक मदत न मिळाल्यास काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यातील सर्व १० तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयांवर धडक मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.
या दुष्काळ पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, विविध संस्थांचे सभापती, लोकप्रतिनिधी तसेच लासोना परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis