
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर (हिं.स.)।हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने अपेक्षेप्रमाणे दमदार कामगिरी करत एशियन गेम्स-२०२६ची विजयी सुरुवात केली. नुकताच आशिया कप जिंकून आलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी जपानचा एकतर्फी सामन्यात ८ विकेट्सनी पराभव केला. या विजयासह भारताने उपांत्य फेरीतही प्रवेश केला आहे. भारतीय संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीतून खेळण्याची संधी मिळाली होती.
भारताने नाणेफेक जिंकून जपानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जपानने सावध आणि संथ सुरुवात केली. मात्र, पॉवरप्लेमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. त्यामुळे जपानचा संघ चांगली धावसंख्या उभारेल, असे वाटत होते. मात्र, सातव्या षटकापासून जपानच्या विकेट्स झपाट्याने पडू लागल्या. अखेर २०व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जपानचा शेवटचा फलंदाज बाद झाला आणि संपूर्ण संघ अवघ्या ५७ धावांवर गारद झाला.
भारताने हे ५८ धावांचे सोपे लक्ष्य अवघ्या पाच षटकांत दोन विकेट्स गमावून गाठले. भारताला पहिली विकेट श्रीचरणीने मिळवून दिली. सातव्या षटकातील दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन विकेट्स घेत तिने जपानच्या फलंदाजीला खिंडार पाडले. त्यानंतर जपानच्या विकेट्स सातत्याने पडत गेल्या.जपानच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला. त्यापैकी अयाका काटो स्टॅफर्डने सर्वाधिक २५ धावा केल्या. तिची सलामीची साथीदार हारुना इवासाकीला १० धावा करता आल्या.
भारताकडून श्रीचरणीने चार षटकांत अवघ्या १० धावा देत दोन षटके निर्धाव टाकली आणि चार विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय शेफाली वर्माने दोन विकेट्स घेतल्या. श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्माच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट आली. तर जपानच्या दोन फलंदाज धावबाद झाल्या.लक्ष्य अत्यंत सोपे असल्याने भारत सहज विजय मिळवेल, याची जपानलाही कल्पना होती. मात्र, जपानच्या गोलंदाजांनी भारताच्या दोन विकेट्स मिळवत काही काळ भारतीय संघाला धक्का दिला. या दोन विकेट्स घेतल्यानंतर जपानच्या संपूर्ण संघाचा आनंद गगनात मावत नव्हता.
स्मृती मंधानाच्या जागी शेफाली वर्मासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आलेली गुणालन कामिलिनी दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर खाते न उघडताच बाद झाली. त्यानंतर भारती फुलमाळीही तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तंबूत परतली. तिने ६ धावा केल्या.दुसऱ्या बाजूला उभी असलेली शेफाली वर्मा मात्र आक्रमक अंदाजात फलंदाजी करत राहिली. तिने अवघ्या १५ चेंडूंमध्ये ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. त्यानंतर ऋचा घोषने षटकार ठोकत भारताचा विजय निश्चित केला. ऋचा ६ चेंडूंमध्ये २ षटकारांच्या मदतीने १२ धावा करून नाबाद राहिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode