पाबळ खोऱ्यात बोगस डॉक्टरवर पुन्हा कारवाई; औषधसाठा जप्त
रायगड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : पेण तालुक्यातील अतिदुर्गम पाबळ खोऱ्यात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा आरोप असलेल्या एकनाथ राघो मोकल (रा. ओवली) याच्यावर आरोग्य विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान त्याच्या ताब्यातील बेकायदेशीर औषधस
2014, 2023, and now 2026; action taken for the third time against a Pabal man accused of being a bogus doctor!


रायगड, 19 सप्टेंबर (हिं.स.) : पेण तालुक्यातील अतिदुर्गम पाबळ खोऱ्यात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा आरोप असलेल्या एकनाथ राघो मोकल (रा. ओवली) याच्यावर आरोग्य विभागाने पुन्हा कारवाई केली आहे. कारवाईदरम्यान त्याच्या ताब्यातील बेकायदेशीर औषधसाठा जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, मोकल याच्यावर यापूर्वीही २०१४ आणि २०२३ मध्ये अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही संबंधित व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले आहे.कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना दुर्गम भागातील नागरिकांवर उपचार केले जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गडब प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन अविनाश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली. या पथकात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी संदीप नरवणे, आरोग्य पर्यवेक्षक समीर सानप आणि रुग्णवाहिका चालक सागर पाटील यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर औषधसाठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार औषधसाठा जप्त करून पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात एकनाथ मोकल याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. वारंवार कारवाई होऊनही संबंधित व्यक्ती पुन्हा वैद्यकीय व्यवसाय कसा सुरू करत होती, तसेच त्याला औषधांचा पुरवठा कुठून होत होता, याची चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

दरम्यान, दुर्गम भागात अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande